बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत राज्यात पावसाचा जोर आणखीच वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील ४८ तासांत मान्सून सक्रिय राहणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळेल. मुंबई, कोकण, पुणे, रायगड जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
याशिवाय मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहणार असून राज्यात २५ आणि २६ सप्टेंबरला विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात छत्री घेऊनच बाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
दरम्यान, येत्या सोमवारपासून (२५ सप्टेंबर) भारतातून परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. दरवर्षी जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. ८ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापतो. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या तो भारतातून माघार घेतो.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा भारतात परतीच्या पावसाचा प्रवास उशिराने सुरू होणार आहे. सोमवारी, २५ सप्टेबरपासून पश्चिम राजस्थानच्या काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.