राज्यात सध्या पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे. आजदेखील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभानाने वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज मुंबईत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आकाश प्रामुख्याने ढगाळ राहील आणि दिवसभर मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. १२ ते १४ जुलै दरम्यान या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. तर मुंबई आणि ठाण्यासाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट दिलाय. हा इशारा १४ जुलैपर्यंत आहे.
काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा, विमान सेवा विस्कळीत झाली होती. शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शहरात गटारे तुंबली होती, तर रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याचं समोर आलं होतं. जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याचं मुंबईत दिसलं होतं.