राज्याच्या विविध भागात मागील काही दिवसांमध्ये परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या तसेच इतर नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, त्याचबरोबर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यातील अमरावती, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा आदी विविध भागातील विविध जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये मागील काही दिवसात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचे नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या विविध प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काढलेली पिके भिजली आहेत.
विशेषतः भात, सोयाबीन, तूर, कपाशी, ऊस आदी विविध प्रकारच्या पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे आणि नुकसान भरपाईसाठी नुकसानग्रस्त गावांमध्ये त्वरित यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात, असे निदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. जिल्हास्तरावरील आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तालुकास्तरीय यंत्रणा, इतर सर्व संबंधित विभाग यांनी यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.