‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम प्रभावीपणे राबवा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
अहमदनगर, दि.११ – राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविण्यात येणारा ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम प्रभावीपणे आणि सामाजिक जाणिवेतून राबवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सुकाणू समितीच्या बैठकीत दिले. या उपक्रमात समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक समर्थ शेवाळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अभिजित हराळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, मोहिमेदरम्यान ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम राबवायचे आहेत. या कालावधीत गावपातळीवरील कायमस्वरुपी अस्वच्छ असलेल्या जागा स्वच्छ कराव्यात. सर्व उपक्रमांचे गावपातळीवर योग्य नियोजन करावे. शहर किंवा गावात प्रवेश करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेला कचरा स्वच्छ करावा. कचरा निर्मितीच्या ठिकाणी विलगीकरण करण्यावर अधिक भर द्यावा. शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचविणाऱ्या अस्वच्छ जागा स्वच्छ करण्यावर विशेष लक्ष द्यावे.
सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यावसायिक व बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक केंद्र, प्रमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटनस्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट नाले स्वच्छ करण्यासाठी एक दिवस श्रमदान उपक्रम आयोजित करावा. त्यात एनएसएस, एनसीसी, बचत गट, ग्रामस्थ आणि शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग घ्यावा.
२ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार असून ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियानाअंतर्गत ग्रामस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामस्थांना या उपक्रमाची माहिती देऊन स्वच्छतेसाठी प्रोत्साहित करावे. सर्व उपक्रमात लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. एकल प्लास्टिक न वापरणे, ओला-सुका कचरा विलगीकरण, ‘एक पेड मां के नाम’ उपक्रम आदींबाबत जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिल्या.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत सफाई कामगारांची व त्याच्यांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करावी. सफाई कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना देण्यात येणारे लाभ किंवा सुविधा देण्याबाबत मोहिमेत भर द्यावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
बैठकीला जिल्ह्यातील गट विकास अधिकारी आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.