अंगणात दगड का फेकले असे विचारल्याचा राग येवून एकाने युवकावर आणि त्याला सोडविण्यास आलेल्या त्याच्या चुलत्यावर दाढी करायच्या वस्तऱ्याने सपासप वार करून जखमी केल्याची घटना नगर तालुक्यातील आगडगाव येथे शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली.
अभिजित गोरक्ष काळे (वय ३०) व त्याचे चुलते भरत शेषराव काळे (दोघे रा. आगडगाव, ता.नगर) असे जखमी झालेल्या दोघांची नावे असून अभिजित काळे याच्या फिर्यादी वरून हल्लेखोर अनिल भाऊसाहेब शिंदे (रा. आगडगाव, ता.नगर) याच्या वर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शिंदे याने फिर्यादी अभिजित काळे याच्या घरासमोरील अंगणात दगड टाकले. ते का टाकले असे विचारले असता त्याचा राग येवून शिंदे याने अभिजित याची गचांडी पकडून त्याला हाताच्या चापटीने मारहाण केली.
नंतर त्याच्या हातातील वस्तऱ्याने उजव्या हातावर, मानेवर, पाठीवर वार करून जखमी केले. हा प्रकार सुरु असताना अभिजित याचे चुलते भरत काळे हे सोडवायला आले असता शिंदे याने त्यांच्या पोटावर, छातीवर व उजव्या खांद्यावर वार केले. तसेच परत जर माझ्या नादी लागले तर एकाएकाला जीवे ठार मारील अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.