श्रीरामपूर-अन्न भेसळ (फूड अॅण्ड ड्रग्स) विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून चार जणांनी तालुक्यातील निपाणीवडगाव येथील योगेश फकीरचंद देवकर, पोपट विलास जायभाये तर कारेगाव येथील सुमित रमेश पटारे यांना एक लाख 58 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली. या घटनेने तालुक्यातील डेअरी मालक व चालक यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे.याप्रकरणी निपाणी वाडगाव येथील डेअरी चालक योगेश फकीरचंद देवकर यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी क्रेटा गाडीतून चार लोक उतरले. त्यांनी स्वतःची ओळख फूड अॅण्ड ड्रग्स ऑफीसर अशी करून दिली. तसेच त्यातील एकाने ओळखपत्र दाखवून कासार असे नाव सांगितले. त्यांनी डेअरीची झडती घेवून दुधाचे सॅम्पल तपासणीसाठी घेतले. यामध्ये त्यांना काही आक्षेपार्ह मिळाले नाही. तेव्हा त्यातील एकाने डेअरीच्या बाजूला असलेल्या कृषी सेवा केंद्रातून सांडलेले खत भरुन ठेवलेली पिशवी डेअरीत आणून ठेवली.
त्याचा फोटो तसेच व्हिडीओ काढला. त्यानंतर त्यांनी कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. नाहीतर तुझ्या डेअरीतील दुधाचे सॅम्पल आमचेकडे असून तुझ्यावर भेसळीची केस करू, अशी धमकी दिली. त्यामुळे मी घाबरलो, त्यांनी माझ्याकडे पुन्हा अडीच लाख रुपयांची मागणी केली. पंरतू शेवटी त्यांना 40 हजार रुपये रोख दिले. त्यानंतर येथीलच डेअरी मालक पोपट विलास जायभाये यांचे 50 हजार, सुमित रमेश पटारे (रा. कारेगाव) यांचेही 68 हजार रुपये कारवाईची भिती दाखवून घेतल्याचे समजले. या प्रकरणाबाबत चर्चा झाल्याने मालुंजा येथील डेअरी चालक रविंद्र बोरुडे यांनाही याबाबत समजले होते.
काल रविंद्र बोरूडे यांच्या डेअरीवर दत्तात्रय वसंतराव साठे व इतर चार अनोळखी इसम यांनी स्वतःची ओळख फुड अॅण्ड ड्रग्स ऑफीसर सांगून कारवाईची भिती दाखवून पैशाची मागणी केली. त्यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहीती दिली. आपल्यावर कारवाई होणार हा संशय आल्याने ते पळून गेले. परंतू पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दत्तात्रय वसंतराव साठे, व कासारे (पूर्ण नाव माहीत नाही व इतर दोन अनोळखी इसम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.