अहमदनगर-गावातील एका व्यक्तीने गावासह केंद्रातील प्राथमिक शिक्षकांच्या विरोधात केलेल्या तक्रारींमुळे गेल्या काही दिवसांपासून गावात शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेले गढूळ वातावरण बदलण्यासाठी व या प्रश्नावर सामोपचाराने सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेल्या ग्रामसभेत तोडगा तर निघाला नाहीच, उलट हाणामाऱ्या झाल्याची घटना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे बुधवारी (दि.३१) घडली. याप्रकरणी ६ जणांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुंडेगाव सह केंद्रातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या विरोधात गावातील भाऊसाहेब शिंदे या व्यक्तीने शिक्षण विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदे याने शिक्षकांच्या केंद्रस्तरीय बैठकीत घुसून गोंधळ घातला होता. त्यावेळी त्याच्यावर शिक्षकांच्या फिर्यादी वरून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हाही दाखल झालेला आहे. शिंदे याच्या कडून सोशल मिडीयावर शिक्षकांबाबत सातत्याने पोस्ट टाकल्या जात असल्याने तेव्हापासून गावात सतत धुसफूस चालू आहे. शिक्षकांवर कारवाईसाठी शिंदे याने सोमवारी (दि.२९) उपोषणही केले होते. गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांनी या ठिकाणी भेट देत कारवाईचे आश्वासन शिंदे यास दिले. तर गावातील अनेक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांची बाजू घेत गावातील शैक्षणिक वातावरण बिघडू नये म्हणून गटशिक्षणाधिकारी जाधव यांची भेट घेवून निवेदनही दिले होते.
या सर्व प्रकाराबाबत सोशल मिडीयावर विविध प्रकारच्या चर्चा सुरु होत्या. या वादावर तोडगा काढण्यासाठी गावात बुधवारी ग्रामसभा बोलावण्यात आली. या ग्रामसभेतही या विषयावरून चांगलेच वादंग झाले व त्याचे पर्यावसन शेवटी एकमेकांना शिवीगाळ करत हाणामारीत झाले. त्यामुळे ग्रामसभा उधळली गेली. हा वाद येथेच न मिटता दुपारी नगर तालुका पोलीस ठाण्यात गेला. तेथे भाऊसाहेब रामदास शिंदे याने दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामपंचायत सदस्य संतोष संभाजी भापकर, सतिश काशिनाथ चौधरी, यश सतिश चौधरी यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी आपण ग्रामसभेत बोलत असताना आपणास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
तर संतोष संभाजी भापकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून भाऊसाहेब रामदास शिंदे, बायडाबाई रामदास शिंदे, निशा भाऊसाहेब शिंदे यांच्या विरोधात भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी ग्रामसभेत शासकीय कर्मचारी, शिक्षक व ग्रामस्थांना अरेरावीची भाषा वापरली, तसेच महिला सरपंच व उपसरपंच यांना शिवीगाळ केली, त्यामुळे आपण त्यांना समजावून सांगत असताना भाऊसाहेब शिंदे याने आपणास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच सतीश चौधरी यांना स्टेज वरून खाली ढकलले त्यामुळे आम्ही दोघे जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.