अहमदनगर – लग्नास नकार दिलेल्या युवतीच्या होणाऱ्या पतीच्या इन्स्टाग्राम खात्यावर युवतीचा मॉर्फ केलेला अश्लील फोटो पाठवून तिची बदनामी करून साखरपुडा मोडला. ही घटना दि. १६ नोव्हेंबर रोजी घडली आहे. मुळची श्रीगोंदा तालुक्यातील व सध्या पुणे येथे राहणाऱ्या पीडित युवतीने याप्रकरणी वानवडी (पुणे) पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तेजस माळशिकारे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. चवरसांगवी, ता. श्रीगोंदा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा तपासकामी तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
फिर्यादी युवती श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील मेडिकलवर ऑगस्ट २०२२ मध्ये प्रॅक्टीस करीत असताना तिची तेजस माळशिकारे याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर युवती डिसेंबर २०२२ मध्ये नगरला शिक्षण घेण्यासाठी आली असता त्यांच्यात मैत्री झाली. तेजस याने युवतीला एक दिवस चांदबीबी महाल व दिल्लीगेट येथे फिरायला नेले.
त्यावेळी दोघांनी फोटो काढले. त्यानंतर तेजस याने युवतीला अंगठी गिफ्ट दिली आणि लग्न करशील का? असे विचारले. युवतीने त्यास नकार दिला व त्याच्याबरोबर बोलणे बंद केले. त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. त्यानंतर त्याने मित्रांमार्फत मेसेज व फोन करून तो आजारी आहे, आयसीयूमध्ये अॅडमिट आहे, असे खोटे सांगून त्रास दिला. एक दिवस त्याने तिला शेवटचे भेटण्यासाठी बोलावले. युवती त्याला भेटण्यासाठी सिध्दीबाग येथे गेली. तेव्हा त्याने पूर्वीचे दोघांचे फोटो दाखविले. त्यास फोटो डिलीट करण्यास सांगितले असता, त्याने ते डिलीट केले नाही.
युवतीने ते फोटो डिलीट करण्याचा प्रयत्न केला असता त्याने ढकलून दिले. त्यानंतर दि. १६ नोव्हेंबर रोजी युवतीचा साखरपुडा होता. त्यापूर्वीच तेजस याने युवतीच्या होणाऱ्या पतीच्या इन्स्टाग्रामवर युवतीचा मॉर्फ केलेला अश्लील फोटो पाठविला व तुम्ही चूक करता तिच्याशी लग्न करू नका, असा मेसेज केला त्यामुळे युवतीचा साखरपुडा मोडला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.