Home नगर शहर नगर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ , चार ठिकाणी घरफोडी करून 11 लाखांचा ऐवज...

नगर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ , चार ठिकाणी घरफोडी करून 11 लाखांचा ऐवज लांबविला

0

अहमदनगर -शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तोफखाना हद्दीत तीन ठिकाणी दिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोकड लंपास केली तर कोतवाली हद्दीतील चार दिवसांपासून बंद असलेले घर फोडून दागिने, रोकड लांबविली. चार ठिकाणी केलेल्या घरफोडीत 10 लाख 80 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. एकाच वेळी चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी नगर शहर पोलिसांना आव्हान दिले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात बुधवारी (11 सप्टेंबर) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बुरूडगाव रस्त्यावरील साईनगरमधील बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने, चार लाख 60 हजाराची रोकड असा सात लाख पाच हजारांचा ऐवज लंपास केला. 7 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरती रवींद्र शेलोत (वय 29) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या काकूचे निधन झाल्याने त्या आई-वडिल व मुलासह 7 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पुणे येथे गेल्या होत्या. जाताना त्यांनी बंगला कुलूप लावून बंद केला होता. त्यानंतर चोरट्यांनी बंगला फोडून ऐवज लंपास केला. सदरची घटना 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

तपोवन रस्ता, समतानगर येथील धनलक्ष्मी रेसीडेन्सी मधील घर अज्ञात चोरट्यांनी फोडले. एक लाखाची रोकड, सुमारे सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने, साडे सहा भाराचे चांदीचे दागिने असा दोन लाख 71 हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत घडली. याप्रकरणी मोनिका किशोर नागरगोजे (वय 42) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी एसटी महामंडळात वाहक म्हणून नोकरीला आहेत. त्या बुधवारी सकाळी साडेसात वाजता ड्यूटीवर गेल्या होत्या. त्यांची मुलगी साडेदहा वाजता घर बंद करून कॉलेजला गेली होती.

दुपारी चार वाजता माय-लेकी सोबत घरी आल्या असता त्यांना घर फोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. तसेच तपोवन रस्त्यावरील मयुर कॉलनीत घरफोडीची दुसरी घटना घडली. व्यंकटेश अपार्टमेंट मधील दिपाली अविनाश दरंदले (वय 40) यांचे घर फोडून चार हजारांची रोकड, 18 ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण असा 54 हजारांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी दुपारी एक वाजता फिर्यादी त्यांचे पती अविनाश व मुलगा हॉस्पिटलमध्ये गेले होते. ते दुपारी दोन वाजता घरी आले असता त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. एक तासात चोरट्यांनी डाव साधला. आडते बाजार येथील गौतम मनसुखलाल भंडारी (वय 44) यांचे वर्षा मेडिकल फोडून चोरट्यांनी 50 हजारांची रोकड चोरून नेली. सदरची घटना 10 सप्टेंबर रोजी रात्री नऊ ते 11 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.