नगर जिल्ह्यात काल रविवारी सायंकाळपर्यंत ढगाळ हवामान होते. त्यानंतर काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी रिमझीम पाऊस कोसळत होता. दोन तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर श्रीरामपुरात काल सायंकाळी रिमझीम सुरू झाली. रात्री 9 वाजेपर्यंत पावसाचा काहीसा जोर वाढला होता. हा पाऊस रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होता. राहुरी तालुक्यातही रात्री काही ठिकाणी रिमझीम तर काही ठिकाणी रिपरिप सुरू होती. संगमनेर, कोपरगाव, राहाता, नगर, कर्जत, जामखेड, अकोले, पाथर्डी, पारनेरात कमी अधिक प्रमाणात रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता. नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मुळा आणि प्रवरा नदीतील विसर्गही कमी झाला आहे.
जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता उपयुक्तसाठा 84.90 टक्के इतका झाला होता. या धरणात काल 16 हजार क्युसेक ने आवक नगर, नाशिक च्या धरणांमधून होत होती. जायकवाडीत यावर्षी लवकर भरण्याचे संकेत आहेत. काल या धरणात मृतसह एकूणसाठा 91.17 टीएमसी इतका झाला होता. या धरणाची क्षमता 102.72 टीएमसी इतकी आहे. 10 ते 11 टीएमसी पाण्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल. त्यातुन विसर्गही खाली सुरू होऊ शकतो. या धरणाचा उपयुक्तसाठा 76.65 टीएमसी इतका आहे. काल या धरणात उपयुक्तसाठा 65.10 टीएमसी इतका झाला होता.