कर्जत (प्रतिनिधी) – सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवाने पदाचा गैरवापर करत देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली तसेच इतर बनावट बिले तयार करुन ती खर्ची टाकून तब्बल ३ कोटी ६७ लाख २० हजार ४३२ रुपयांचा अपहार केल्याची घटना सोसायटीच्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सोसायटीच्या सचिवावर वर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सहकारी संस्थांचे प्रमाणित लेखापरीक्षक कार्यालय, केडगाव येथील लेखापरीक्षक निर्मला दत्तात्रय मोर (रा.श्रीगोंदा) यांनी कर्जत पोलिस ठाण्यातसोमवारी (दि.९) दुपारी फिर्याद दिली आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये तत्कालीन सचिव देविदास रामहरी इंगळे (रा. दिघी, ता. कर्जत) याने दि.१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत आपल्या पदाचा गैरवापर करत सोसायटीचे संचालक, सभासद यांची खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली.
देखभाल दुरुस्ती खर्चाची तसेच इतर खर्चाची बनावट बिले तयार करुन ती खर्ची टाकून सोसायटीच्या खात्यातून एकूण तब्बल ३ कोटी ६७ लाख २० हजार ४३२ रुपये इतकी रक्कम वेळोवेळी काढून घेत त्या रकमेचा अपहार केल्याचे संस्थेच्या लेखापरीक्षक अहवालात उघडकीस आले. त्यानंतर लेखापरीक्षक निर्मला मोर यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सचिव इंगळे यांनी सदर अपहार केलेल्या रकमेचा वापर स्वताच्या फायद्यासाठी करत संस्थेची, संचालकांची, सभासदांची दिशाभूल करत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी संस्थेचा सचिव देविदास रामहरी इंगळे याच्याविरुद्ध भा.दं.वि.क. ४२०, ४०६, ४०९, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बोऱ्हाडे हे करीत आहेत.