मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची राहाता येथे झालेल्या सभेत किशोर दंडवते यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे पँडल असा 11 लाख रूपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. दंडवते यांच्या तक्रारीवरून या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) करून आरोपी अमोल बाबासाहेब गिते रा. आगसखांड, ता. पाथर्डी याला जेरबंद केले असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबतची हकिगत अशी की, फिर्यादी किशोर चांगदेव दंडवते रा. साकुरी, ता. राहाता, जि. अहमदनगर हे साकुरी येथील विरभद्र मंदीरासमोर असलेल्या मनोज जरांगे पाटील याचे सभेकरीता गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे पेंडल असा एकुण 10 लाख 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदर घटनेबाबत राहाता पोलीस ठाणे गु.र.नं. 519 / 2023 भादवि कलम 379 प्रमाणे अनोळखी चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्हयातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकिस आणला.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा ठिकाणचे आजुबाजुस असलेले सी.सी.टी.व्ही. फुटेज संकलित करुन तसेच गुप्त बातमीदारामार्फत आरोपीची माहिती काढत असतांना पोनि दिनेश आहेर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अमोल बाबासाहेब गिते रा. आगसखांड, ता. पाथर्डी यास ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेता त्याचे अंगझडतीमध्ये गुन्ह्यातील गेले मालापैकी 1 लाख 25 हजार रुपये किमतीची अंदाजे 25 ग्रॅम वजनाची सोन्याची तुटलेली चैन मिळुन आली आहे.
तपासात चोरीचे वेळी असलेल्या त्याचे इतर साथीदाराबाबत विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार नविन माने रा. भिंगार, ता. जि. अहमदनगर व संदीप झिंजवडे रा. पाथर्डी यांचेसोबत चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी अमोल बाबासाहेब गिते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यावर पाथर्डी, अहमदनगर तसेच विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. पुढील तपासासाठी आरोपी अमोल गिते याला राहाता पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे.