शिवसेना शिंदे गटाकडून अखेर संदीपान भूमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भूमरे यांना शिंदे गटाने रिंगणात उतरवलं आहे. येथून आधीच ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे संभाजीनगरमध्ये खैरे विरुद्ध भुमरे यांच्यामध्ये सामना रंगणार आहे.
शिवसेना शिंदे गटाने आजच परिपत्रक काढून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यातच शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच म्हणजेच शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट दोन शिवसैनिक आमनेसामने आले आहेत. संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू होती. मात्र ही जागा अखेर शिंदे गटाच्या पारड्यात पडली असून संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.