भालगावच्या ग्रामस्थांनी याबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी तसेच पोलिस प्रशासनाला निवेदन पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, मनोरमा खेडकर या भालगावच्या सरपंच होत्या तेव्हा त्यांनी गावाचा विकास करत कायापालट केलाय. मात्र मुळशी प्रकरणात त्यांची नाहक बदनामी सुरु आहे. मुळशी प्रकरणात केवळ एकच बाजू जाणीवपूर्वक दाखवण्यात येत आहे आणि खरी बाजू लपवण्यात येत आहे.
5 जून 2023 रोजी साधारणः दुपारच्या वेळी मुळशी परिसरातील काही गुंड प्रवृतीच्या लोकांनी हातात काठ्या, कमरेला धारदार हत्यार घेऊन मनोरमा खेडकर यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तब्बल 20 मिनिट हा धिंगाणा सुरू होता.
मनोरमा खेडकर यांच्या सुरक्षारक्षकांनी जमाव हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव हटत नव्हता. तेव्हा मनोरमा खेडकर यांनी स्वः संरक्षणासाठी स्वतः जवळचे परवाना असलेले पिस्तूल बाहेर काढले. तेव्हा कुठे जमाव बाजूला झाला आणि मनोरमा खेडकर यांचा जीव वाचला. या घटनेची ही खरी सत्यता आहे. मात्र सध्या खेडकर कुटुंबाबाबत जाणीवपूर्वक दहशत पसरवत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.
या घटनेची पारदर्शक चौकशी होण्यासाठी गावातील शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत असं निवेदनात म्हटले आहे. सोबतच मनोरमा खेडकर यांची बदनामी थांबवावी, अन्यथा भालगाव गावातून मुंबईपर्यंत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.