अहमदनगर-आर्मीमध्ये सिव्हिल डिफेन्स, एम.टी.एस. कुक, क्लर्कमध्ये भरती करून देतो म्हणून काही तरूणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नगरमध्ये समोर आला आहे.मिलीटरी इंटेलिजन्स व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सिव्हिल डिफेन्स कुक विजय बीस्ट (पूर्ण नाव नाही, रा. वाकोडी फाटा, ता. नगर) याला ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २०२३ मध्ये विजय बीस्ट याने आर्मीमध्ये सिव्हिल डिफेन्स, एम.टी.एस. कुक, क्लर्क मध्ये भरती करतो. माझी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख आहे. असे म्हणुन तरूणाचा विश्वास संपादन करून नोकरीस लावतो असे म्हणुन दोन लाख रूपये घेऊन त्याची फसवणूक केली आहे.तसेच उत्तराखंड, पंजाब व अहमदनगर येथील काही तरूणांना नोकरीस लावुन देतो, असे म्हणुन त्यांच्याकडून ८ लाख ३० हजार रूपये घेऊन त्यांचीही फसवणूक केली असल्याची माहिती मिलीटरी इंटेलिजन्स, नगर, दक्षिणी कमान इंटेलिजन्स बटालियन यांना मिळाली होती.
त्यांनी याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार मिलीटरी इंटेलिजन्स व भिंगार कॅम्प पोलिसांनी संयुक्त तपास करून विजय बीस्ट याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुशंगाने चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
तसेच त्याने भरतीसाठी उभ्या केलेल्या उमेदवारांची येथील एका खासगी रूग्णालयातून बनावट वैद्यकीय तपासणी केली असून तो लष्कर व संरक्षणाच्या नागरी रोजगारासाठी फसव्या भरती रॅकेटमध्ये सामील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागील पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस अंमलदार संदीप घोडके, दीपक शिंदे, रवी टकले, मिसाळ, प्रमोद लहारे यांनी केली आहे.