गणपती बाप्पाच्या आगमनानंतर राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात दमदार पाऊस कोसळत आहेत. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत राज्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
ध्या मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच कोकण ते गोवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी आणखीच पोषक वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये धुव्वाधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने कोकणात अतिवृष्टी, तर कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’, तर पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देखील जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.