Saturday, September 14, 2024

राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण,पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले

राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

शिर्डी, दि.६- पंचायत समितीच्या इमारती ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू आहेत. या विकासाच्या मंदिराचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राहाता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार पंकजा मुंडे, आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, राहाता पंचायत समितीच्या इमारतीच्या माध्यमातून सामान्य माणसाला सक्षम करण्याचे काम होणार आहे. ही इमारत विकासाचे मंदीर म्हणून नावारूपाला येणार आहे. इमारतीसाठी खास बाब म्हणून मान्यता देण्याचे काम तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात नवी पहाट आणणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभामुळे महिला सक्षम होणार आहेत. महिला उद्योजक व्हाव्यात यासाठी महिला बचतगटांना प्रोत्साहन दिले जाईल.

येत्या काळात जिल्ह्यातील ७० हजार तरुणांना वेगवेगळ्या औद्योगिक अस्थापनांमध्ये रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेत पहिल्या सहा महिन्यांसाठीचे मानधन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून दिले जाईल.

गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी १९१ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. समुद्रात वाहून जाणारे ५३ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासनाने मंत्रीमंडळात ६२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दहा वर्षांत प्रथमच जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येत असल्याचे सांगून राहाता येथील पोलीस वसाहतीसाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शिर्डी एमआयडीसीत डिफेन्स क्लस्टर मंजूर झाले आहे. यातून येत्या काळात २ हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती श्री. विखे पाटील यांनी दिली.

नवीन प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे काम अधिकाऱ्यांनी करावे, अशी अपेक्षा आमदार पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रामविकास मंत्री असताना राज्यात ९८ पंचायत समित्यांच्या इमारतींना ४३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचेही त्या म्हणाल्या.

पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने योजना राबवण्याचे काम होईल आणि त्याचे फायदे सर्वसामान्य नागरिकांना मिळतील, अशी अपेक्षा यावेळी आमदार श्री. काळे यांनी व्यक्त केली.

नवीन इमारतीच्या माध्यमातून नागरिकांची कामे अधिक जलदगतीने करण्यावर प्रशासनाचा भर राहणार असल्याचे प्रास्ताविकात आशिष येरेकर यांनी सांगितले.

यावेळी शिवाजीराव कर्डिले, अण्णासाहेब म्हस्के यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणात निवड झालेल्या दोन लाभार्थी तरुणींना नियुक्ती आदेश देण्यात आले. मयत ग्रामपंचायत कर्मचारी कै. विजय साळुंखे यांच्या पत्नी अर्चना यांना पन्नास लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश वितरित करण्यात आला. ओम साई व रमाई या महिला बचतगटांना कर्ज वितरणाचा धनादेशही वितरित करण्यात आला. महिला बचतगटातील महिलांना फूड प्रोसेसिंग युनिट्सचे वाटप करण्यात आले.

अशी आहे नवीन प्रशासकीय इमारत –
राहाता पोलीस स्टेशनशेजारी असलेल्या १९९२.३१ चौरस मीटर जागेत १४ कोटी ६१ लाख रुपयांच्या निधीतून ही दोन मजली इमारत साकार झाली आहे. या इमारतीत पंचायत समितीच्या विविध प्रशासकीय विभागांचे २० हून अधिक सुसज्ज दालने आहेत. शंभर जणांच्या बैठक व्यवस्थेचे सभागृह आहे. इमारतीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles