अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती माधुरी ए. बरालिया यांनी चौधरी वाडी, ढवळपुरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथील २०२१ साली झालेल्या खून प्रकरणातील आरोपी पोपट उर्फ नाना मारुती जाधव वय 37 वर्षे राहणार ठाकरवाडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांस त्याने त्याची गर्भवती पत्नी नंदा पोपट जाधव हिस तिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचे पोटातील मूल हे त्याचे पासून नसल्याचा संशय मनात धरून ती गर्भवती आहे हे माहीत असतानाही तिचे पोटात, छातीत व शरीरावर इतर ठिकाणी लाथाबुक्याने जोरजोरात गंभीर स्वरूपाची मारहाण करून तिला गंभीर जखमी करून तिला व तिचे पोटातील पाच महिने वयाचे अर्भकास जीवे ठार मारले त्यानंतर तिचे प्रेत कोणाला मिळून येऊ नये व पुरावा नष्ट व्हावा म्हणून दिनांक ३०/०३/२०२१ रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास मयत नंदा हिचे प्रेत आरोपीने मोटार सायकलवर नायलॉन दोरीच्या साह्याने बांधून पाईनचा तलाव धोत्रे बुद्रुक तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे घेऊन जाऊन प्रेतास बांधून आणलेल्या दोरीच्या साह्याने तिच्या पोटाला मोठा दगड बांधून प्रेत पाण्यात टाकून दिल्याच्या प्रकरणात भारतीय दंड विधानचे कलम ३०४ अन्वये दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.
प्रकरणाची अधिक माहिती : मयत नंदा हिने २०१५ साली आरोपी सोबत विवाह केला होता. मयत नंदा व आरोपी हे राजेंद्र भिमाजी चौधरी राहणार चौधरवाडी, ढवळपुरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर यांच्याकडे घटनेच्या आधी सहा महिन्यापासून वाट्याने शेती करून त्यांची उपजीविका भागवीत होते मयत नंदा तिचे २०१५ साली लग्न होऊन देखील तिला मूलबाळ झाले नव्हते परंतु घटनेच्या आधी चार ते पाच महिन्यापासून ती गर्भवती होती व ती गर्भवती राहिल्यापासून आरोपी हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पोटातील मुल हे त्याचे नसल्याचे सांगून तिला वेळोवेळी मारहाण करत होता. दिनांक २९/०३/२०२१ रोजी रात्री १०:३० वाजता आरोपी व मयत नंदा यांचे दरम्यान मयत नंदा हिच्या पोटातील मुल हे आरोपीचे नसल्याचा संशय असल्याने त्यांचेदरम्यान वाद होऊन त्यातूनच आरोपीने मयत नंदा हिला लाथा बुक्क्याने तिच्या पोटात, छातीत व इतर ठिकाणी मारून तिला जीवे ठार मारून टाकले व सकाळी लोकं उठायच्या अगोदर तिला दोरीने मोटारसायकलला बांधून तिला एकट्यानेच पाईनचे तलावाजवळ घेऊन जाऊन तिला ज्या दोरीने मोटारसायकलला बांधले होते त्याच दोरीने तळ्याजवळील एक मोठा दगड मयत नंदा हिच्या पोटाला बांधून मयत नंदा हिचे प्रेत तळ्यात टाकून दिले. सबब मयत नंदा हिचा भाऊ सुरेश सिताराम केदार याने दिलेल्या फिर्यादनुसार पारनेर पोलीस ठाण्यात गु. र. नं. २१४/२१ नुसार आरोपीविरुद्ध नंदाचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पारनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केला. तपासादरम्यान, आरोपीनेच नंदा हिस जिवे ठार मारले व तिच्या तिच्या पोटाला दगड बांधून तिचे प्रेत तलावा टाकून पुरावा नष्ट केल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात मयताचा भाऊ फिर्यादी सुरेश सिताराम केदार , पंच शरद वाघ, माधव पथवे, साक्षीदार रवी जाधव, राजेंद्र चौधरी, मंगेश दुधावडे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय चौगुले, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाचारणे, पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती साळवे व मयताचे शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी शंकर डोईफोडे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण व ग्राह्य धरण्यात आल्या. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदारांनी दिलेले पुरावे, दाखल केलेली कागदपत्रे आणि परिस्थितीजन्य पुरावे हे आरोपीविरुद्ध गुन्हा शाबित करण्याकामी सबळ व पुरेशी असल्याने तसेच आरोपीने केलेला नंदा जाधव हिचा खून निघृण स्वरूपाचा असल्याने व आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने आरोपी पोपट उर्फ नाना मारुती जाधव यांस त्याने त्याची गर्भवती पत्नी नंदा पोपट जाधव हिस तिचे पोटातील पाच महिने वयाचे अर्भकास जीवे ठार मारले व पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणात भारतीय दंड विधानचे कलम ३०४ अन्वये दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भारतीय दंड विधानचे कलम २०१ अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.
सदर प्रकरणात आरोपीतर्फे घेण्यात आलेले बचावाचे मुद्दे न्यायालयाने ग्राह्य धरले नाहीत. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता केदार गोविंद केसकर यांनी कामकाज पाहिले. सदर प्रकरण चालविणेकामी अॅड. केसकर यांना जिल्हा सरकारी वकील श्री सतीश पाटील यांनी मार्गदर्शन व पैरवी पोलीस श्री. एस. एन. बडे व श्री के. एन. पारखे यांनी मदत केली.