अहमदनगर-पती- पत्नीच्या वादातून सासुरवाडीच्या लोकांनी जावयाला रस्त्यात अडवून धारदार शस्त्राने वार केले. तसेच लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात घडली. या घटनेत जावई गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुशांत इगनाती केदारी (वय 33 वर्षे रा. गुरुकुल वसाहत, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, घरगुती वादातून सुशांत केदारी यांची पत्नी माहेरी राहत होती. तेव्हा वाद निर्माण होऊन सुशांत केदारी यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात फिर्याद दिली होती. दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजे दरम्यान सुशांत केदारी हे राहुरी फॅक्टरी येथील वाणीमळा नगर-मनमाड महामार्गावरून जात होते. तेव्हा तेथे त्यांचा सासरा, मेव्हुणा व इतर सहा ते सात लोकांनी येऊन त्यांना अडविले आणि म्हणाले की, तू आमचे विरुद्ध संगमनेर येथे फिर्याद का दाखल केली, असे म्हणून सुशांत केदारी यांना शिवीगाळ करून धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. तसेच लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तू पुन्हा संगमनेर येथे दिसलास, तर तुला जिवे ठार मारून टाकू, अशी धमकी दिली.
या घटनेत सुशांत इगनाती केदारी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी पोलिसां समक्ष दिलेल्या जबाबावरून आरोपी सासरा शाम माणिक लोखंडे, मेव्हुणा यश शाम लोखंडे व इतर 5 असे एकूण 6 ते 7 जणांवर जबर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






