Friday, February 7, 2025

पत्नीच्या चारित्र्याचा संशय कुऱ्हाडीचे सपासप घाव घालून खून , पारनेर तालुक्यातील घटना

पारनेर (प्रतिनिधी) – चारित्र्याचा संशय घेऊन पतीने ६५ वर्षीय पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे सपासप घाव घालून खून केल्याची खळबळजनक घटना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे घटस्थापनेच्या दिवशी गुरुवारी (दि.३ ऑक्टोबर) सकाळी घडली. पत्नीचा खुन केल्यानंतर पतीनेही गळफास घेउन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला.

ताराबाई राजाराम थोरात (वय ६५, रा. बोरवाक मळा, ढवळपुरी, ता.पारनेर) असे मयत महिलेचे नाव असून राजाराम रेवजी थोरात (वय ७०) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीतीनुसार ढवळपुरी शिवारात वनकुटे रोडवर बोरवाक मळा येथील राजाराम व त्याची पत्नी ताराबाई यांच्यात गुरूवारी सकाळी घरामध्ये वाद झाले. राजाराम याचा पत्नी ताराबाई हिच्या चारित्र्यावर संशय होता. त्याच रागातून राजाराम याने पत्नी ताराबाई हीस चटके दिले. त्यानंतर शेजारच्या कपाशीच्या शेतामध्ये नेऊन कुऱ्हाडीने डोक्यावर सपासप वार केले. त्यात पत्नी ताराबाई हिचा जागीच मृत्यू झाला.

गुरूवारी सकाळी ही घटना घडली, त्यावेळी राजारामचा मुलगा संजय हा शेतामध्ये काम करण्यासाठी गेला होता तर सुन आशा जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या. त्या घरी आल्या असता घरामध्ये भाकरी अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून आल्याने त्यांना संशय आला. त्यांनी सासरा राजाराम याच्याकडे आत्या कुठे गेल्या याची विचारणा केली असता राजाराम याने हाताने विहीरीकडे बोट दाखविले. सासू- सासऱ्यांमध्ये भांडण होऊन सासऱ्याने सासूला विहीरीत ढकलून दिल्याचा संशय सुन आशा यांना आला. त्यांनी विहीर परीसरात पाहणी केली असता त्यांना तिथे काही आढळून आले नाही.

सुन आशा या सासू न सापडल्याने परत घरी आल्या. त्यावेळी घरामध्ये राजाराम याने फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता. आशा आल्या त्यावेळी दोरी तुटल्याने गळयाला दोरी बांधलेल्या अवस्थेत राजाराम जमीनीवर पडलेला होता. आशा यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलवून राजाराम यास रूग्णालयात दाखल केले.

सायंकाळी राजाराम शुध्दीवर आला. राजाराम यास रुग्णालयात दाखल केल्यानंतर आशा व त्यांच्या मुलाने सासूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असताना घराजवळच्या कपाशीच्या शेतामध्ये ताराबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. मृतदेहाजवळ गुन्हयात वापरण्यात आलेली कुऱ्हाडही आढळून आली.

घटनेनंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. आशा संजय थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजाराम रेवजी थोरात (वय ७०) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles