नगर – महावितरणच्या शेतातून गेलेल्या वाहिनीची तार तुटून खाली पडली व या तारेला चिकटून शॉक बसल्याने दोघा शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर कल्याण रोड वरील रेल्वे उड्डाणपूल परिसरात नेप्ती (ता.नगर) गावच्या शिवारात मंगळवारी (दि.२४) सायंकाळी घडली.
या दुर्घटनेत आकाश लालू निसाद (वय १२) व घनश्याम राजू मुखीचा (वय १२, दोघे रा. दिनेश हॉटेल पाठीमागे, कल्याण रोड) या दोघांचा मृत्यू झाला असून त्यांच्या बरोबर गेलेला आणखी एक जण सुदैवाने बचावला आहे. दोघे मयत आणि आणखी एक जण असे तिघे जण मंगळवारी (दि.२४) सायंकाळी ४.३० ते ५ च्या सुमारास नेप्ती शिवारात रेल्वे लाईनच्या पुढील बाजूस बायपास रस्त्याच्या जवळ असलेल्या एका बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेले होते. त्या बंधाऱ्याजवळून महावितरणची वीजवाहिनी गेलेली आहे. या वाहिनीची एक तार तुटून ती बंधाऱ्याजवळ पडलेली होती. त्या तारेतून बंधाऱ्याच्या पाण्यात वीज प्रवाह उतरलेला होता.
मासे पकडण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एक जण पाण्यात उतरताच त्याला विजेचा शॉक बसून तो पाण्यात बुडाला, दुसरा तेथून पळायला लागला, मात्र त्याचा तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने त्यालाही शॉक बसला. त्यामुळे दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. हे पाहून त्यांचा तिसरा साथीदार घाबरून घराकडे पळत आला. त्याने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर मयत मुलांच्या नातेवाईकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
ही माहिती नगर तालुका पोलिसांना मिळताच स.पो.नि. प्रल्हाद गिते यांनी पोलिसांचे पथक पाठविले. महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. या वीज वाहिनीवरील वीज पुरवठा खंडित केल्यानंतर दोन्ही मयत मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास महिला अंमलदार रेपाळे या करीत आहेत.