नगर : शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे, पोलीस तपासही वेळेवर होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत आहे, यातून बाजारपेठेत सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे, या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तपासाला गती द्यावी अन्यथा २८ नोव्हेंबर दाळमंडईत उपोषण करू असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदनातून दिला. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, अजिंक्य बोरकर आदींसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले आडते बाजार, दाळमंडई, एम.जी. रोड व त्या लगतचा सर्व परिसर या भागात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून पोलीस प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचे उपाययोजना किंवा चोऱ्या कशा रोखता येतील याबाबत कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नसून ज्या चोऱ्या झाल्या आहेत. त्याबाबतीत ही आजपावेतो योग्य असा तपास होऊन आरोपी अटक झालेले नाहीत. दिनांक ११ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रताप हर्दवाणी यांना मारहान करून त्यांच्याकडील त्यांची पैश्याची बॅग हिसकावून घेऊन काही चोरटे पळून गेले होते. त्याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून तसाच काहीसा प्रकार हा दिपक आहुजा यांच्या बाबतीत डाळमंडई परिसरात घडला होता. त्यात ही त्यांना मारहान करुन त्यांच्या ही पैश्याची बॅग हिसकावून चोरली होती.अशा चोरीच्या घटना सध्या बाजारपेठ परिसरात घडत आहेत. आज पर्यंत सदर चोरीचा उलगडा पोलीस प्रशासनाकडून झालेला नसून सदरचे आरोपी हे आजही मोकाट फिरत आहेत. तरी अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी हे आज या वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे भयभीत झाले असून त्यांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास कमी होताना दिसत आहे. सदरच्या चोऱ्यांच्या प्रकारातून एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही काही महिन्यापूर्वी अहमदनगर शहरालगतच चोरीच्या घटनेतूनच खूनासारखी गंभीर घटना घडली होती. अशी एखादी घटना घडण्याची वेळ पुन्हा येऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून काही तरी ठोस उपाययोजना करण्याची गरज असून बाजारपेठेतील चोऱ्यांच्या बाबतीत जर तपास लवकरात लवकर लागला नाही तर आम्ही स्वतः मंगळवार दि. २८ नोव्हेंबर रोजी अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेत उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे.
सध्या शहरात गाडीचा पाठलाग करून व्यापारी व नागरिकांना धारधार शस्त्रांचा धाक दाखवत धमकावत चोरी होत आहे. महिलांचे मंगळसूत्र चोरी, चैन स्नॅचिंगच्या घटना घडत आहे, यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी तसेच पोलीस अधिकारी हे ड्रेसकोडमध्ये असतात मात्र अनेक कर्मचारी सिव्हिल ड्रेसमध्ये दिसून येतात त्यामुळे पोलिसांची गुन्हेगारांमध्ये भीती राहिली नसल्याचे पाहायला मिळत आहे, असे आ. संग्राम जगताप म्हणाले.
शहरात रात्री ११ नंतर मोकाट फिरणाऱ्यांवर १२२ व ११० कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे, याचबरोबर वाहनांना नंबर प्लेट नसणारे, गाडीची कागदपत्रे नसणारे, वाहतुकीचे नियम मोडणारे, तसेच रस्त्यांवर टोळक्याने जमा होत वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी केली जाणार असून चोरट्यांवर आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल असे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले