नवी दिल्ली : भाजपने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जमवलेल्या प्रचंड निधीतून राजकीय क्षेत्रातील लोकांवर दबाव आणला. केंद्राच्या अखत्यारीतील यंत्रणा आणि पैशांच्या बळावर भाजपने देशातील लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भाजपने गेल्या १० वर्षांत ४११ आमदारांना फोडले, सरकारे पाडली. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना धमकावले. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला, असे अनेक आरोप काँग्रेसने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या काळ्यापत्रिकेत (ब्लॅक पेपर) करण्यात आले आहेत.
केंद्रातील मोदी सरकारची गेली दहा वर्षे म्हणजे अन्यायाचा काळ असल्याचा ठपका काँग्रेसने ठेवला आहे. ‘दहा वर्षांचा अन्यायाचा काळ (२०१४-२४)’ या मोदी सरकारविरोधातील काळ्यापत्रिकेत केंद्राच्या कथित चुकीच्या आर्थिक धोरणाची चिरफाड करण्यात आली आहे. काळ्यापत्रिकेत चीनविषयक धोरण, ‘ईडी’चा गैरवापर, अग्निपथ योजनेतील फोलपणा, प्रसारमाध्यमांवरील अंकुश, रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर घाला अशा अनेक आर्थिक मुद्द्यांच्या अनुषंगाने मोदी सरकारवर टीकास्त्रे डागण्यात आली आहेत.
मी आणखी पाच वर्षे सत्तेत राहीन असे सांगण्यापेक्षा मोदींनी गेल्या १० वर्षांत त्यांच्या सरकारने काय केले हे सांगायला हवे होते. पण, ते केवळ काँग्रेसवर टीका करत राहतात. खरे तर मोदींनी महागाई, बेरोजगारी, आर्थिक विषमता या मुद्द्यांवर बोलायला हवे होते. परंतु ते फक्त ‘मोदीची गॅरंटी’ असे म्हणतात. वास्तविक या गॅरंटीतून लोकांची दिशाभूल केली जात आहे