लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज बांधणारे सर्व्हे समोर येत आहेत. काल टाइम्स नाऊचा सर्व्हे समोर आला होता. आज ‘इंडिया टुडे मूड ऑफ नेशन’चा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेतून इंडिया आघाडीच्या पारड्यात महायुतीपेक्षा अधिक जागा दाखविल्या आहेत. महाराष्ट्रातील ४८ पैकी २६ जागांवर इंडिया आघाडी मुसंडी मारेल, असे सांगण्यात आले आहे.
इंडिया टुडेचा ‘द मूड ऑफ द नेशन्स फेब्रुवारी २०२४’ हा सर्व्हे सर्व लोकसभेतील ३५,८०१ प्रतिसादकर्त्यांच्या आधारावर बेतलेला आहे. १५ डिसेंबर २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या काळात हे सर्वेक्षण केले गेले. इंडिया आघाडीला २६ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करत असताना भाजपा आणि एनडीए आघाडीला २२ जागा मिळू शकतील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.
इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या कामगिरीवर नजर टाकली असताना काँग्रेस पक्षाला चांगला पाठिंबा मिळत असल्याचा दावा सर्व्हेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला १२ जागा मिळतील, असे दाखविण्यात आले आहे.
शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार यांना एकत्रित १४ जागा मिळतील असे सर्व्हेच्या माध्यमातून सांगण्यात आले.