आगामी लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने मोठे संघटनात्मक फेरबदल केले आहेत. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशातून डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्याजागी अविनाश पांडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून रमेश चेन्निथला यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी मीडियालाही ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीआधी प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी केले होते. पण या निवडणुकीत त्यांचा काहीच प्रभाव पडला नाही. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडून या जबाबदारीतून मोकळे करण्यात आले आहे. तसेच इतर कोणतेही राज्य त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले नाही. अविनाश पांडे हे उत्तर प्रदेशचे प्रभारी असतील.
केरळमधील ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असतील. माणिकराव ठाकरे यांना गोव्यासह दमण व दीव आणि दादरा व नगर हवेलीचे प्रभारी करण्यात आले आहे. मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभारी करण्यात आले आहे.