छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत कधी लुटलीच नव्हती, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. श्री शिवरायानी सुरतेच्या केलेल्या प्रचंड लुटीची खबर औरंगजेबास लाहोर येथे समजली होती. पण नागपूरच्या फडणवीसांना अजून ती उमजलेली नाही. राजकारण करा पण त्यासाठी इतिहास बिघवडू नका, असे इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे.
इंद्रजीत सावंत यांनी म्हटले की, सूरत या शहराला मुघली साम्राज्यात बंदर-ए-मुबारक म्हटले जायचे. सूरत हा मुघली साम्राज्याच्या गालावरचा तीळ आहे, असेही म्हटले जायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 आणि 1670 अशा दोन वेळेस औरंगजेबाचे बंदर असलेल्या सुरतेवर छापा टाकला. त्यांनी हे बंदर दोनवेळा लुटले. यावेळी शिवाजी महाराजांनी वीरजी व्होरा, हाजी बेग, हाजी सय्यद या बड्या व्यापाऱ्यांकडून प्रचंड मोठी संपत्ती आणली होती.
सुरतच्या पहिल्या लुटीवेळी इनायत खान हा सुरतेचा सुभेदार होता. त्याने शिवाजी महाराजांकडे एक दूत पाठवला होता. त्याच्यासोबत इनायत खानाने एक मारेकरी पाठवत शिवाजी महाराजांशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या मावळ्यांनी सुरतेला आग लावून सुरत बेचिराख केली होती, हा इतिहास आहे. सुरतेची लूट हे मध्ययुगातील मुघलांची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी टाकलेले पाऊल होते. स्वराज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी या संपत्तीचा वापर करण्यात आला, हा इतिहास आहे. पण देवेंद्र फडणवीस आता खोटा इतिहास सांगत आहेत. ही त्यांची राजकीय रणनीती असावी.