अहिल्यानगर -बीड जिल्ह्यातील साईराम मल्टिस्टेटमध्ये सुमारे 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून या प्रकरणात गुन्हाही दाखल आहे. या गुन्ह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील नावाजलेली संत भगवान बाबा मल्टिस्टेटचा चेअरमन मयूर वैद्य याला संशयित आरोपी करण्यात आले आहे. साईराम मल्टिस्टेटच्या व्यवहारांची पडताळणी करताना मयूर वैद्य याच्या संस्थेशी व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. वैद्य याने पैशांची हेराफेरी करण्यात मदत केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्याचे गुन्ह्यात नाव येताच त्याने पळ काढला आहे. बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला चौकशीसाठी बोलविले होते. तो चौकशीला हजर राहिला. मात्र गुन्ह्यात नाव येताच त्याने पलायन केले आहे. बीड पोलीस त्याच्या मागावर आहेत. मयूर वैद्य व त्याच्या संबंधित भगवान बाबा मल्टिस्टेटचे नाव साईराम मल्टिस्टेटमधील घोटाळ्याशी जोडले गेल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यानिमित्ताने घोटाळा घालणारी आणखी एक संस्था समोर आली आहे. भगवान बाबा मल्टिस्टेटच्या नगर शहरासह शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी, बोधेगाव येथे शाखा आहेत.
साईराम मल्टिस्टेट या संस्थेच्या घोटाळ्याचे एकूण सहा गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल आहेत. सुमारे 100 कोटींच्या घोटाळ्याचा अंदाज आहे. या गुन्ह्याचा तपास बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यांनी या गुन्ह्याशी संबंधीत तिघांना अटक केली आहे. साईराम मल्टिस्टेटच्या व्यवहारांची पडताळणी करताना मयूर वैद्य याच्या भगवान बाबा मल्टिस्टेट या संस्थेशी व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. बोल्हेगाव उपनगरातील परदेशी नावाच्या व्यक्तीची जागा अहिल्यानगर शहरातील एका प्रसिध्द बिल्डरने डेव्हलप करण्यासाठी घेतली होती. दरम्यान, त्या बिल्डरने ती जागा साईराम मल्टिस्टेटकडे तारण ठेवून सुमारे 11 कोटी रूपयांचे कर्ज घेतले. पुढे हे कर्ज थकीतमध्ये जावून 18 कोटींवर पोहचले. साईराम मल्टिस्टेटने बिल्डरकडे तगादा सुरू केल्यानंतर त्याने नगरी भाषेत त्यांना दमबाजी केली.
या सर्व प्रकरणात नंतर भगवान बाबा मल्टिस्टेट व त्याचा चेअरमन वैद्या यांनी उडी घेतली. त्यांनी कर्ज फेडीची हमी घेत तारण ठेवलेली जागा डेव्हलप करण्यासाठी त्याच्या एका बिल्डर नातेवाईकांच्या नावाने घेतली. तसेच साईराम मल्टिस्टेटला ठेव ठेवण्यास सांगितले. साईराम मल्टिस्टेटने भगवान बाबा मल्टिस्टेटमध्ये सुमारे 30 कोटी रूपयांची मुदत ठेव ठेवली. पुढे वैद्य व त्याच्या भगवान बाबा मल्टिस्टेटने त्याच 30 कोटीमधून नगरमधील बिल्डरने घेतलेले व थकीतमध्ये गेलेले साईराम मल्टिटेस्टचे कर्ज फेडीपोटी सुमारे 17 कोटी रूपये दिले. ज्या परदेशी नावाच्या व्यक्तीची जागा होती त्याला देखील सहा कोटी रूपये व नगरच्या बिल्डरला सात कोटी रूपये दिले. या सर्व पैशांची वैद्य व त्याच्या भगवान बाबा मल्टिटेस्टने हेराफेरी केल्याने त्यांचा साईराम मल्टिस्टेटच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे वैद्य याला संशयित आरोपी करण्यात आले आहे.