आमिर खानची लेक आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यांचा विवाहसोहळा लवकरच मुंबईत पार पडणार आहे. सध्या कलाविश्वात या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आयरा-नुपूरचं केळवण अभिनेत्री मिथिला पालकरच्या घरी करण्यात आलं होतं. त्यांच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये आयरा-नुपूरच्या लग्नाबाबत चर्चा सुरू आहेत.
शिखरे कुटुंबीय लाडक्या सुनेचं जोरदार स्वागत करणार असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आयरा खानच्या सासरी तिच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. ३ जानेवारीला आयरा आणि नुपूर यांचा विवाहसोहळा ताज लँड्स एंडमध्ये पार पडणार आहे. यानंतर दोघेही पाहुण्यांना रिसेप्शन पार्टी देणार आहेत.
लग्नानिमित्त आमिर खानच्या होणाऱ्या जावयाच्या म्हणजेच नुपूर शिखरेच्या संपूर्ण घरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्याची आई व इतर नातेवाईक नुपूरचं औक्षण करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.