ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्टवादी शरद पवार गटातून पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांची भाजप घरवापसी होईल, अशी चर्चा होती. मात्र आता एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झाली नाही, असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपमध्ये आपला प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती आपण भाजपकडे केली होती. मात्र, भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
भाजपामध्ये जाण्याची माझी इच्छा होती. माझ्या काही अडचणी होत्या. त्या मी जयंत पाटील यांना सांगितल्या होत्या. मात्र, भाजपकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे. भाजपमध्ये जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपा प्रवेश करण्यात आला. मात्र, त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही.