मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका मुलाखतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘भाजप आता स्वत:चं स्वत:ला चालवू शकतो. क्षमता कमी असताना संघाजी गरज होती, असं वक्तव्य भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. जेपी नड्डा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं.
‘अटल बिहारी वाजपेयी असताना पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. त्यावेळी भाजपची क्षमता कमी होती. आता आमची क्षमता वाढली आहे. आम्ही आता आधीपेक्षा सक्षम झालो आहोत. भाजप आता स्वत:च स्वत:ला चालवू शकतो, असे जेपी नड्डा म्हणाले.’भाजप आता मोठा झाला आहे. या पक्षातील नेते कर्त्यव्य आणि भूमिका निभावत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामजिक संघटना आहे. तर भाजप हा राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ वैचारिक पातळीवर काम करते, असेही ते म्हणाले.
जेपी नड्डा पुढे म्हणाले, ‘मथुरा आणि वाराणसीमधील वादग्रस्त जागांवर मंदिर तयार करण्याची अद्याप काही योजना नाही’. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी झाली. संघ हा भाजपचा वैचारिक मार्गदाता आहे. संघाने राजकीय नेते मोठे करण्यास मदत केली. भाजपचे अनेक नेते संघाचे कार्यकर्ते आणि सदस्य आहेत. संघाचं नेतृत्व मोहन भागवत करतात.