नगर -जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) संजय काशिद यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई येथे भाजपाच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी दि 23 रोजी दुपारी दोन वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री तसेच महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी भुपेंद्रजी यादव, महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहिर पक्षप्रवेश होत आहे.
यामुळे नगर जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ झाली आहे.अनेक वर्षापासून ते जामखेड तालुका शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून काम करत होते. अडचणीच्या काळात शिवसेनेला साथ देण्याचे काम त्यांनी केले. तरूणांची मोठी फौज त्यांच्या कडे आहे. पाच वर्षापूर्वी महाविकास आघाडीकडून रोहित पवार आमदार झाले. पण पाच वर्षांत रोहित पवार यांनी मित्रपक्षाला कधीही विश्वासात घेतले नाही. उलट मित्रपक्षचे खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले. संजय काशिद हेही खुपच स्वाभीमानी राहिले एकदाही आमदार रोहित पवार यांच्या कडे गेले नाहीत. याउलट आमदार प्रा. राम शिंदे यांनी वेळोवेळी मदत केली.