Home राजकारण राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका… अजित पवार, एकनाथ शिंदेंना प्रतिसाद नाही…

राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका… अजित पवार, एकनाथ शिंदेंना प्रतिसाद नाही…

0

जळगाव : महाराष्ट्रात पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचले नसल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपला बसेल, असा दावा भाजप प्रवेशासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत राज्यात ४० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपच्या नेतृत्वातील रालोआला मोठे नुकसान होण्याची शक्यता अनेक संस्थांच्या मतदानोत्तर पाहणीतून वर्तविण्यात आली आहे. यावरून खडसे यांनी भाजपला टोला हाणला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतला. उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला. ज्यांनी हे पक्ष उभे केले, त्यासाठी परिश्रम घेतले, त्यांच्या हातातून हे पक्ष इतरांच्या हातात जाणे, हा फोडाफोडीच्या राजकारणाचा परिणाम असल्याचे जनतेला वाटले. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही, असे खडसे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात गेल्यावेळेपेक्षा यावेळी चार जागांचा फटका भाजपला बसत असल्याचे चाचण्यांमधून दिसते आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती आणि मनातून शिवसेनेला मतदान करण्याची भूमिका जनतेने घेतल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी विकासकामे केली, ते पाहता जनतेने त्यांना पुन्हा पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत असल्याचे खडसे यांनी सांगितले. चारशेपार टप्पा गाठला जाईल, अशी अपेक्षा नाही. मात्र हा आकडा ३५० पार होईल, असा विश्वास आहे. आतापर्यंत जेवढे मतचाचणी अहवाल आले, त्यात रक्षा खडसे या विजयी आघाडीवर दिसत आहेत. रक्षा खडसे या एक लाखावर मताधिक्क्याने निवडून येण्याचा विश्वास असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.