मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या ८ तारखेपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उपोषणाला परवानगी नाकारण्यात येत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे आता काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी करत मनोज जरांगे येत्या शनिवारपासून आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र, त्यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटी येथील काही ग्रामस्थांनी विरोध केला होता. याबाबत त्यांनी गावकऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं.
मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं गावकऱ्यांनी निवेदनात म्हटलं होतं. या निवेदनावर अंतरवाली सराटी गावच्या उपसरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या होत्या. त्यामुळे जरांगे यांचं उपोषण वादात सापडले होते.