मारकडवाडी प्रमाणे लोकशाही टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्यभर होईल -रोहित पवार
पक्षांतर्गत निवडीत मला डावलले नाही
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
जामखेड – अकलूजच्या मारकडवाडी येथे लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांनी प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाने तो हणून पाडण्याचा केलेला प्रयत्न दुर्दैवी असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. जामखेड मधे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. याबाबत रोहित पवार म्हणाले की आमदार उत्तमराव जानकर हे एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येणार असा त्यांना विश्वास होता. मात्र ते केवळ १५००० मतांनी निवडून आले. त्यांच्या मतदार संघातील अनेक गावातील नागरिकांनी मतदानाची आलेली आकडेवारी बाबत आश्चर्य व्यक्त करून ईव्हीएम मशीन बाबत संशय व्यक्त केला होता. लोकशाहीमध्ये नागरिकांना असलेला संशय दूर करणे वास्तविक हे काम निवडणूक आयोग आणि प्रशासन करणे आवश्यक होतं. मात्र त्याऐवजी मारकडवाडी मध्ये प्रचंड पोलीस तैनात करून नागरिकांवर दहशत करण्यात आली. अनेक निर्बंध आणले गेले. कारवाईची भीती दाखवली गेली. मात्र येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अनेक गावात मारकडवाडी प्रमाणे नागरिक लोकशाही पद्धतीने मतपत्रिकेवर मतदान घेण्याची शक्यता असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन लोकशाही टिकवण्यासाठी जेही काही प्रयत्न करत असतील त्यासाठी निवडणूक आयोगाने सहकार्य करणे अपेक्षित आहे. उलट कारवाईची भीती दाखवणे हे अयोग्य असून आम्ही संविधानाचा आदर करणारे असून लोकशाही टिकवण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील असंही रोहित पवार यांनी आवर्जून सांगितले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गटनेते, प्रतोद आदी निवडी माझ्या संगण्यावरूनच पवार साहेबांनी केल्या असल्या आहेत, त्यामुळे या निवडीमध्ये मला स्थान दिले गेले नाही किंवा मला डावलले गेले असे म्हणणे चुकीचे असल्याचे रोहित पवार यांनी म्हंटले आहे. मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असून पक्षातील अनुभवी असे जितेंद्र आव्हाड तसेच नवीनच निवडून आलेले रोहित पाटील यांच्या निवडी योग्य असून पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समंतीने या निवडी झाल्या आहेत. भविष्यात दोन्ही सभागृहात प्रभावीपणे काम व्हावे म्हणून अजूनही काही निवडी होणार आहेत. मी पक्षासाठी काम करत राहणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगताना पक्षांतर्गत कसलेही मतभेद नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.
बहुमत असताना दहा-अकरा दिवस उलटले तरी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ स्थापन होणे हे चिंताजनक आहे असे सांगताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असून ते लवकर तंदुरुस्त व्हावेत आणि राज्यात नवे मंत्रिमंडळ स्थापन व्हावे, कुठेतरी एव्हढे मोठे संख्याबळ असताना काहीच हालचाली होत नसल्याने सर्वकाही आलबेल वाटत नाही असा टोला रोहित पवार यांनी यावेळी लगावला.
माझा विजय पन्नास हजार मतांपेक्षा अधिक मतांनी व्हायला हवा होता. मात्र आम्ही ईव्हीएम बाबत राज्यभर भांडतच आहोत. त्याच बरोबर माझ्या मतदारसंघात विरोधी भाजप उमेदवाराकडून पैशाचा मोठा वापर केला गेला. एक-एक मताला दोन-दोन कुठे तीन-तीन हजार रुपये वाटले गेले. जातीयवाद, धर्मवाद पेटवण्याचा प्रयत्न झाला, त्याच बरोबर गुंडांचा वापर केला गेला असा आरोप रोहित पवार यांनी केला. शेवटी मी थोड्या मतांनी निवडून आलो असलो तरी आता मतदारसंघाचा आमदार आहे असेही ते म्हणाले.