जरांगे पाटलांनी फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रीत करावे. विनाकारण देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. श्रीरामपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा ना. विखे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खरेतर जरांगे पाटील यांनी इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. फडणवीस मुख्यमंत्री असतानाच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवलं. ज्याने काम केले त्याला श्रेय द्यावे. आरक्षणाबाबत ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी महायुती सरकारने पुढाकार घेतला आहे, असेही ना. विखे यांनी स्पष्ट केले.
टीका करून आरक्षण मिळणार नाही, असे सांगतानाच, शरद पवार चार वेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते. काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी सत्ता भोगली. आज ही मंडळी एकही शब्द बोलायलाही तयार नाहीत, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. मनोज जरांगे यांनी गोलमेज परिषद घ्यावी. त्यात काँग्रेसचे बोलघेवडे, आणि उबाठाच्या स्वयंघोषित नेत्यांना बोलवावे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र त्या आडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचे थांबवावे. फडणविसांची भूमिका कालही प्रामाणिक होती, आजही आहे आणि उद्याही राहील, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.