बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांचे महिला सक्षमीकरणासाठी चांगले काम असून राजकारणात देखील त्या चांगले काम करू शकतील. यामुळे विधानसभेच्या पुढील निवडणुकीत जयश्री थोरात याना उमेदवारी करण्याची संधी मिळावी, असे भाष्य खासदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या पुढाकाराने संगमनेर शहरात भव्य महिला मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. या मेळाव्यात प्रणिती शिंदे यांनी जयश्री थोरात यांच्या विधानसभा उमेदवारीबाबत भाष्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र त्यांना विधानसभेत यायाचं की नाही हे त्यांनीच ठरवावे; अशी प्रतिक्रिया देखील प्रणिती शिंदे यांनी दिली आहे
. प्रणिती शिंदे यांनी केलेल्या भाष्याबद्दल विचारले असता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी देखील सूचक वक्तव्य केले आहे. पुढे विधानसभा निवडणूक लढवायचीच आहे. मात्र आत्ताची की भविष्यातील हे साहेब ठरवतील, असं जयश्री थोरात यांनी म्हंटल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये काही ट्विस्ट येतो का याची उत्सुकता वाढली आहे.