अहमदनगर=बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेतील हजारो ठेवीदारांची फसवणूक आणि मनी लाँडरिंग प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाच्या अर्थात ईडीच्या मुंबईतील पथकाने राज्यातील बीड, छ. संभाजीनगर, पुणे आणि नवी मुंबई येथील कार्यालयांवर छापे टाकले. ईडीने या शोध मोहिमेत जंगम मालमत्ता, कागदपत्रे, संगणकांसह सुमारे 1 कोटी 20 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि इतर संचालकांविरूध्द ठेवीदारांची फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. नगर जिल्ह्यातही श्रीरामपूर, जामखेडमध्ये गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत नोंदविलेल्या गुन्ह्यांनुसार सुमारे 168 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.
ज्ञानराधा पतसंस्थेचे व्यवस्थापक सुरेश कुटे, यशवंत कुलकर्णी आणि इतर संचालकांंनी वैयक्तिक कर्ज, साधे कर्ज, वेतन कर्ज, मुदत कर्ज, सुवर्ण कर्ज अशा विविध योजना राबविल्या. त्यांनी विविध ठेवयोजनांवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेत हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. सुरेश कुटे व त्याच्या सहकार्यांनी ठेवीदारांकडून जमा केलेल्या ठेवींचा वैयक्तिक फायद्यासाठी केला आहे. ठेवीदारांची रक्कम इत्तर उद्यागात आणि कुटे ग्रुप मध्ये गुंतवणूक केली. बोगस सेल कंपन्यांचे जाळे तयार करून मनी लाँडरिंगद्वारे हाँगकाँगला पैसे पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.