के.के. रेंज हद्दीतील कापरी नदीत बोटी लावून अवैध वाळू उपसा सुरु
महिनाभरापूर्वी तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने जिल्हा प्रशासनाला स्मरणपत्र
अवैध वाळू उपसा न थांबल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या अवैध वाळू उपसाची तक्रार करुन महिना उलटून देखील कारवाई होत नसल्याने आदिवासी सामाजिक कार्यकर्ते राजू लक्ष्मण पवार यांनी मंगळवारी (दि.6 ऑगस्ट) निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षकांना स्मरणपत्र दिले. तर वाळू तस्करांनी दिलेल्या तक्रारीनंतर धमक्या देत आनखी जोमाने वाळू उपसा सुरु केला असल्याचे स्मरणपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. सदरचा अवैध वाळू उपसा न थांबल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ढवळपुरी (ता. पारनेर), नांदगाव शिंगवे (ता. नगर) आणि नांदगाव-देहरे-नगर मार्गे मार्गे के.के. रेंज या लष्करी भागातील कापरी नदीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. वाळू तस्करीकडे महसुल विभाग व संबंधित पोलीस प्रशासनाची डोळेझाक सुरू असल्याने कोणालाही न जुमानता ट्रॅक्टर, डंपरद्वारे भरधाव वेगाने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतुक सुरु आहे. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व ग्रामस्थांना याचा त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर वाळू तस्करांपासून होणारा त्रास थांबावा म्हणून पवार यांनी 3 जुलै रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे वाळू उपसा थांबविण्याची मागणी केली होती.
अवैध वाळू वाहतुकीपासून ढवळपुरी (ता. पारनेर) व नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या सहा वाळू काढण्याच्या बोट सुरु असून, वीस ते पंचवीस हायवा टिप्पर वाळू घेऊन भरधाव वेगाने चालत आहे. या गाड्यांचा जाण्या-येण्याचा मार्ग ढवळपुरी, सुतारवाडी, लालूचा तांडा, जांभूळबन हा असून, ते या मार्गाने के.के. रेंजच्या कापरी नदीत वाळू भरण्यास येतात व वाळू भरुन जातात.
मागील महिन्यात पाच ते सहा जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु होता. याप्रकरणी निवेदनद्वारे तक्रार केल्याप्रकरणी वाळू तस्करांनी धमकावले असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे. सध्या वाळूतस्करांनी वाळू काढण्यासाठी वाळूच्या बोटी सुरु केल्या असून, कापडी नदीमध्ये के.के. रेंज हद्दीत मुळा धरणांमध्ये नांदगाव व जांभुळबंद हद्दीत उपसा चालू केला असल्याचे स्मरणपत्रात म्हंटले आहे.
वाळू तस्करांना पाठीशी घालण्यासाठी ढवळपूरी, नांदगाव येथील महसूल व पोलीस प्रशासन सहभागी असल्याने या अवैध वाळू उपसावर कारवाई होत नाही. तर अर्ज, तक्रारी केल्यास सबंधीत अधिकारीच वाळू तस्करांना माहिती पुरवीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी वाळू उपसा सुरु असल्याचे व्हिडिओचे पुरावे जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
के.के. रेंज हद्दीतील कापरी नदीत बोटी लावून अवैध वाळू उपसा सुरु
- Advertisement -