लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या टप्प्यात सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याणमधील जागेकडे लागले आहे. या ठिकाणी मतदान होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण-मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अरविंद मोरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या सभेत व्यासपीठावर स्थान न मिळाल्यामुळे अरविंद मोरे यांनी पक्ष सोडला आहे.
अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याण येथे प्रचार सभा घेतली. या सभेत व्यासपीठावर आपल्याला मान दिला नाही. माझी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती आहे. माझ्या हाताखाली आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह इतर पदाधिकारी देखील काम करतात. त्यांना व्यासपीठावर जागा देण्यात आली. मात्र आम्ही काम करून सुद्धा आम्हाला व्यासपीठावर जागा देण्यात आली नाही. मग या पदाचा काय फायदा? असे अरविंद मोरे यांनी म्हटले आहे.