कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांनी आम्हाला गृहीत धरू नये, असा इशारा कर्जत येथे काँग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आला आहे.
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चिन्ह गायब झालेले आहे. जिल्ह्यातील दोन जागा आहेत, मात्र एकही जागा काँग्रेसला मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आज कर्जत येथे काँग्रेस पक्षाची बैठक झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष कैलास शेवाळे, तालुकाध्यक्ष किरण पाटील, निरीक्षक प्रशांत दरेकर, सचिन घुले, शंकर देशमुख, ओंकार तोटे, बापूसाहेब काळदाते, मुबारक मुबारक, हर्ष शेवाळे, भाऊसाहेब तोरडमल, तात्यासाहेब ढेरे, सतीश पाटील, अतुल सुरबुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आणि त्यांचे आमदार रोहित पवार यांच्यावर उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त केली.
या बैठकीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि पक्षाला गृहीत धरू नका, असा थेट इशारा देण्यात आला आहे. यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवार लंके यांची अडचण वाढणार आहे, असे दिसून येत आहे.
या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी शरद पवार गटावर गंभीर आरोप केले. मागील वीस वर्षांपासून काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिलेल्या उमेदवाराचे काम करत आहे. मात्र, निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे हे उमेदवार भाजपमध्ये जातात, अशी देखील टीका यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. .
पुढील काळामध्ये नीलेश लंके व आमदार रोहित पवार यांना मदत करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक होऊन त्यामध्ये सकारात्मक निर्णय झाला तर आणि पुढील निवडणुकांमध्ये सत्तेमध्ये योग्य वाटा मिळणार असेल व कार्यकर्त्यांना सन्मानाने वागणूक मिळणार असेल तरच लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करू, असा इशारा देण्यात आला.