कर्जत जामखेड मतदार संघामध्ये सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी तसेच मविआकडून पुन्हा रोहित पवार यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र रोहित पवार यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून विरोध केला जात असल्याचे समोर आले आहे.
मागील चार वर्षात रोहित पवार यांनी महाविकास आघाडीचा धर्म मतदार संघात पाळला नाही असा आरोप स्थानिक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळू नये म्हणून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्याचे सांंगण्यात येत आहे.
दरम्यान, कर्जत- जामखेड मतदारसंघात 2014 साली काँग्रेसच्या तिकिटावर किरण पाटील हे उमेदवार होते. त्यामुळे पुन्हा हा मतदारसंघ आम्हाला मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष आणि त्याचसोबत ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात रोहित पवार यांच्या उमेदवारीवरुन आघाडीत वादाची ठिणगी पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.