जय पवारांच्या कर्जत-जामखेड दौऱ्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. पक्षफुटीनंतर शरद पवारांसोबत राहिलेल्या रोहित पवारांना धक्का देण्यासाठी अजित पवार गटानं त्यांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याच व्यूहनीतीचा भाग म्हणून जय पवार कर्जत-जामखेडच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भेटीगाठी, बैठकांच्या माध्यमातून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कर्जत-जामखेडमध्ये अजित पवार गट रोहित पवारांविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार २०१९ मध्ये, तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार २०२४ मध्ये लोकसभा लढल्या. पण निवडणुकीच्या राजकारणात दादांच्या पत्नी, लेकाची डाळ शिजली नाही. त्यानंतर आता दादांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जय पवारांना बारामतीमधून संधी देण्याबद्दल अजित पवारांनी सकारात्मक उत्तर दिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.