रिपोर्ट – विधानसभेचा / आखाडा – नासीर पठाण
आ. रोहीत पवारांच्या विरोधात एकजुटीचे दर्शन
औचित्य वाढदिवसाचे …साखर पेरणी विधानसभेची
———————————————————— स्पेशल रिपोर्ट –
विधानसभेचा / आखाडा – नासीर पठाण
जामखेड – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर्जत जामखेड मधील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत आ. रोहीत पवार हटावचा नारा अप्रत्यक्ष दिला. २०१९ मध्ये हेच नेते, कार्यकर्ते आ. रोहीत पवार यांच्या बरोबर होती. ह्या पाच वर्षांत काय बिनसले की आ. रोहीत पवार यांना अनेक जण सोडून जात आहे. याचे आत्मपरीक्षण आ. पवारांनी करणे गरजेचे आहे. स्वपक्षातील व मित्रपक्षातीतील दुरावलेले सर्वजण हे भाजप नेते आ. राम शिंदे यांच्याजवळ जात आहे. ३० आँगस्ट पर्यत आ. राम शिंदे हे विधानपरिषदेचे सभापती होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. शिंदे सभापती झाले तर त्यांना विधानसभा लढता येणार नाही त्यामुळे आपला मार्ग मोकळा झाला आहे त्यामुळे आ. रोहीत पवार यांच्यावर नाराज असलेले सर्वजण एकत्र येऊन तिकिट कोणाला मिळो एकास एक फाईट झाली तर स्थानिक व बाहेरचा मुद्दा हाती घेऊन निवडणूक जिंकता येईल असा विश्वास व्यक्त करून प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रयोग झाला आहे यामागे आ. राम शिंदे यांचा अप्रत्यक्ष हातभार होता हे लपून राहिलेले नाही.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ २००९ साली खुला झाल्यानंतर आमदारकीसाठी अनेक मातब्बरांनी नशीब आजमावले यामध्ये कर्जतमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र फाळके, राष्ट्रीय कॉग्रेस बापूसाहेब देशमुख, भाजप शिवसेनेकडून प्रा. राम शिंदे, पै. प्रवीण घुले, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, भाऊसाहेब जंजीरे तर जामखेड मधून फक्त प्रा. मधुकर राळेभात यांनी निवडणूक लढविली होती. यामध्ये प्रा. राम शिंदे यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली होती. तेव्हापासून आजतागायत वरील सर्वजण आमदारकीचे स्वप्न बाळगून आहेत.
२०१४ मध्ये आ. राम शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेने रमेश खाडे, राष्ट्रवादीकडून राजेंद्र फाळके व कॉंग्रेस कडून किरण पाटील यांच्यात लढत झाली होती त्यावेळी आ. राम शिंदे यांनी एकतर्फी विजय मिळविला होता व भाजप सेनेची सत्ता आली आ. राम शिंदे राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्रीपद पाच वर्षे राहीले होते. 2019 विधानसभा निवडणुकीत आ. राम शिंदे यांना कर्जत जामखेड मधून लढण्यासाठी कोणीच तयार होईना त्यावेळी मतदारसंघातील राजेंद्र फाळके, अँड. कैलास शेवाळे, प्रविण घुले, प्रा.मधुकर राळेभात, राजेंद्र गुंड, सचिन गायवळ, किरण पाटील, विजय देशमुख, दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा अंजली ढेपे तसेच विखे गटातील अंबादास पिसाळ, जिल्हा बँकेचे संचालक जगन्नाथ राळेभात, अंकुश ढवळे या सर्व विरोधकांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना आ. रोहीत पवार यांना उमेदवारी करण्यासाठी आग्रह केला. व आ. रोहीत पवार यांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान केले. रोहीत पवार व आ.राम शिंदे यांच्यात लढत झाली व रोहीत पवार यांनी ४३ हजार मताधिक्यांनी विजय मिळवून भाजपचा २५ वर्षांपासूनच्या बालेकिल्लेला सुरूंग लावला.
रोहीत पवार आमदार झाल्यानंतर कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेची स्थापना करून मतदार संघाचा रोडमॅप तयार केला तसेच अडिच वर्षाच्या सत्तेच्या काळात एकतर्फी कारभार केला. ज्या लोकांना विधानसभा निवडणुक २००९ व २०१४ साली लढवली अशा सर्वांना त्यांच्या गावापुरते मर्यादित ठेवले व स्टेजवर उपस्थिती राहील याची दक्षता घेऊन स्वताचे कट्टर कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पाठबळ दिले तसेच यांनी आणलेल्या कामांना दुर्लक्षीत केले ही बाब प्रवीण घुले यांना पटली नाही त्यांनी आ. राम शिंदे यांच्याशी जवळीक साधत आ. रोहीत पवार यांची व कॉंग्रेस पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. आ. रोहीत पवार यांच्यावर स्वपक्षातील नाराजी हळूहळू वाढत गेली.
राष्ट्रवादी व शिवसेना फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आ. रोहीत पवार यांच्यावर नाराज व दुखावलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा मनीषा गुंड, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, प्रा. सचिन गायवळ, संध्या सोनवणे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला तर बापूसाहेब नेटके यांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे. आ. रोहीत पवार यांना एक एक करीत अनेक मोहरे निघून जात आहे ही आ. पवारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. २००९ साली विधानसभा निवडणुकीत ३० हजार मते मिळालेली माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांनी ११ आँगस्ट रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून विधानसभा लढण्याचे संकेत दिले. यावेळी कर्जत येथून एकाच गाडीत आलेले जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुंड यांनी मतदारसंघात चाचपणी करून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. त्यांनी प्रा. मधुकर राळेभात लढणार असेल तर माघारीची तयारी दर्शविली यामुळे तालुक्यातील राजकीय गणिते बदलण्यास सुरवात झाली असल्याचे बोलले जात आहे.
आ. राम शिंदे यांना हे सर्व होणे अपेक्षित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. रोहीत पवार यांची उमेदवारी फिक्स आहे. तर भाजपची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत आ. राम शिंदे कर्जत जामखेड व आ. सुरेश धस यांना आष्टी पाटोदा शिरूर मधून यांचे हात वर करून जाहीर केली आहे. आ. रोहीत पवार यांच्याकडून दुखावलेले आ. राम शिंदे यांना साथ देतील पण त्यांच्या आमदारकीच्या स्वप्नावर पाणी फिरणार आहे परंतु आ. रोहीत पवार नको या भावनेतून एकत्र आलेल्यांना मतदारांना कसे सांगणार असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच मागील चार दिवसापासून आ. राम शिंदे हे विधान परिषदेचे सभापती होणार असल्याने त्यांना निवडणूक लढता येत नाही ते बिनबोभाट २०२८ पर्यत सभापती राहतील व त्यांच्या आमदारकीची टर्म तेव्हा संपत आहे. तसेच आ. राम शिंदे यांनी आपला वारस तयार केला नाही त्यामुळे संधी मिळू शकते या हिशोबाने सर्व विरोधक सध्या एकत्र येत आहेत. त्यामुळे आधी आपल्यात मेळ बसवून भाजपच्या तिकीटावर महायुतीने दोन महिन्यात विविध लोकप्रिय घोषणा करून मतदारांना आकर्षित केले आहे याचा लाभ घ्यायचा असा सर्व आ. रोहीत पवार विरोधकांची व्यूहरचना असल्याचे बोलले जात आहे.
रोहीत पवार आमदार व्हावे म्हणून २०१९ ला एकत्र आलेले सर्वजण २०२४ मध्ये दुरावले आहेत. स्वपक्षातून आव्हान मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंबालीका कारखाना कर्जतमध्ये आहे . त्यांना मानणारा वीस हजाराचा गठ्ठा आहे. तसेच भाजपची ताकद मतदारसंघात मोठी आहे. यामुळे आ. रोहीत पवार मतदारसंघात एकाकी पडत असल्याचे चित्र तयार झाले आहे ही त्यांच्यासाठी मोठी धोक्याची घंटा आहे.
प्रतिनिधी नासी