कर्जत तालुक्यातील महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाच्या वसाहतीचा (एम.आय.डी.सी.) प्रश्न आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून पूर्वी प्रस्तावित करण्यात आलेली जागा आता रद्द करण्यात आली आहे. भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी आमदार पवार यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे
आमदार पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एमआयडीसीसाठी पाठपुरावा केला. चापडगाव जवळची जागा त्यासाठी प्रस्तावित करण्यात आली होती. आघाडीचे सरकार गेल्यानंतर नव्या सरकारकडेही त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला. जीआर काढण्याच्या मागणीसाठी आंदोलनही केले. त्याच दरम्यान आमदार शिंदे यांची या प्रश्नात एंट्री झाली. ज्या जागेत ही एमआयडीसी होत आहे, त्याला स्थानिक पातळीवर विरोध असून त्यातील काही जागा नीरव मोदीच्या मालकीची असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. त्यामुळे हा प्रश्न भिजत पडला.
आमदार प्रा राम शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे की,
कर्जत जिल्हा अहमदनगर नियोजित एमआयडीसी बाबत उद्योग मंत्री नामदार श्री उदय सामंत साहेब यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली बैठकीमध्ये निर्णय झाला की पाटेगाव ग्रामपंचायत तिने विरोध केला असल्याने त्याचबरोबर देशाला फसवलेल्या भगोडा निरव मोदीची जमीन असल्यामुळे सदरील प्रस्तावित एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून कर्जत तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी उद्योगधंदे आले पाहिजेत त्या दृष्टिकोनातून उद्योग मंत्री नामदार उदय सामंत साहेब यांनी कर्जत तालुक्यातील इतर जमीन ( नियम , अटी व शर्तीला पुर्ण करणारी ) एमआयडीसीसाठी लागणारी जमिनीचा परिपूर्ण प्रस्ताव 15 दिवसाच्या आत तयार करून शासनाला सादर करावा असे स्पष्ट निर्देश दिले.
आपल्याला युवकांना , सुशिक्षित बेरोजगाराला काम देण्यासाठी एमआयडीसी मंजूर करणे गरजेचे आहे असे स्पष्ट निर्देश आजच्या बैठकीमध्ये दिले.
– आ प्रा राम शिंदे
माजी मंत्री