“मी नेहमी सांगतो की कुणाचाही नाद करावा पण पवारांचा नाद कुणी करू नये. कर्जत – जामखेडमध्ये देखील कोणाच्या डोक्यात काही असेल तर त्यांनाही सांगतो. एवढेच नव्हे तर हात जोडून विनंती करून सांगतोय की, नाद करा पण पवारांचा नाद करू नका अन्यथा तुमचं राजकीय नुकसान करून घ्याल” असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी भाजप नेते राम शिंदे यांना अप्रत्यक्षपणे सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी भाजपचे आमदार राम शिंदे यांना उद्देशून सल्ला दिला आहे. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे आमदार रोहित पवार यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदारांचा भव्य नागरी सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
निलेश लंके म्हणाले, बचतगटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचं काम रोहित पवारांनी केलं. महाराष्ट्रात सर्वात जास्त डिजीटल शाळा माझ्या कर्जत-जामखेडच्या मतदारसंघात आहेत. आज आपण उपजिल्हा रुग्णालायचं त्याठिकाणी भूमीपूजन करतोय. महाविकास आघाडीच्या काळात सर्वात जास्त निधी आणण्याचं काम रोहित पवारांनी केलं. आम्ही सुद्धा आमदार होतो, आम्हाला अंदाज पण येऊ देत नव्हते. कोणाला वाटतं असेल उलट पालटं करु. काही होतं नसतं तु्म्ही काळजी करु नका. 80 हजार ते 1 लाख मतांची मताधिक्य रोहित पवारांना मिळेल, तेही केवळ रोहित पवारांच्या कामामुळे मिळेल, असंही लंकेंनी सांगितलं.