महाराष्ट्रातील जमिनी मोठ्या प्रमाणात बळकवल्या जात आहेत. मराठी माणसाच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही, अशी टीका मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे मनसेतर्फे सहकार शिबीराचे उदघाटन करत असताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. राज ठाकरे पुढे म्हणाले, “आपल्याकडचे नेते लाचार, मिंधे झाले आहेत. पैशांसाठी वेडे झालेले आहेत. त्यांना तत्त्व कळत नाहीत. त्यांना पाठिचा मनका नाही, स्वाभिमान नाही. आज इकडून तिकडे गेले, उद्या तिकडून इकडे आले, याशिवाय दुसरे काही चालू नाही. घरी गेल्यावर त्यांना कदाचित घरातलेही विचारत असतील आज कुठे आहात? मध्यंतरी मी विधानभवनातील एका कार्यक्रमात गेलो, तेव्हा मला कळेचना कोण कुठल्या पक्षात आहेत. त्यांनी त्यांची मने आणि स्वाभिमान गहाण टाकलेला आहे. पण तुम्ही तो टाकू नका. माझ्या मनसे सैनिकांकडून कधीही स्वाभिमान गहाण टाकला जाणार नाही.”
राज ठाकरे यांनी जमिनीचा मुद्दा समजावून सांगत असताना जोतीराव फुले यांचे उदाहरण दिले. “फुले यांचा उल्लेख करत असताना त्यांनी महिलांना शिक्षण दिले, असे आपण म्हणतो. ते त्यांनी केलेच. पण त्याशिवाय त्यांनी त्यावेळी राज्यातील जमिनी सावकाराच्या घशात जाऊ नये, यासाठी पहिले आंदोलन केले होते”, अशी आठवण राज ठाकरे यांनी करून दिली.
आपल्याकडचे नेते लाचार, मिंधे..पैशांसाठी वेडे झालेले आहेत
- Advertisement -