कर्जत : कर्जत तालुक्यातील कोंभळी, खांडवी, रवळगाव व थेरगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या एमआयडीसीच्या जागेचे रूपरेखा सर्वेक्षण नुकतेच सुरू झाले आहे. कोंभळी, रवळगाव, थेरगाव या भागात प्रस्तावित जागेत एमआयडीसी होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रूपरेखा सर्वेक्षण झाल्यानंतर प्रस्तावित जागेचा भूसंपादनाचा देखील मार्ग मोकळा होणार आहे.
एमआयडीसीच्या पथकाचे कोंभळी, खांडवी, रवळगाव व थेरगाव परिसरातील नागरिकांचे वाजतगाजत स्वागत केले. अवर्षणप्रवण भागात एमआयडीसी होत असल्याने येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे यावेळी दिसून आले. औद्याोगिक विकास महामंडळाच्या पथकाने प्रस्तावित जागेचे रूपरेखा सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली असून, या पथकात एमआयडीसीचे प्रमुख भूमापक एस. डी. खैर, भूमापक एस. के. राठोड, तसेच एमआयडीसीने निनाळे इंजिनीअर्स या कंपनीला रूपरेखा सर्वेक्षणाचे काम दिले असून त्या कंपनीचे भूमापक वासुदेव गावडे हे देखील कंपनीच्या कर्मचारी यांच्यासह प्रस्तावित जागेवर हजर झाले आहेत.
रूपरेखा सर्वेक्षण होण्यासाठी सुमारे आठ दिवसांचा कालावधी लागणार असून त्यानंतर अंतिम झालेल्या जागेचे भूसंपादन होणार आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, कर्जत भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव, संचालक कुंडलिक गांगर्डे, उपसरपंच मारुती उदमले, थेरगावचे सरपंच मिनिनाथ शिंदे, मोहन खेडकर, आण्णा महारणवर, सोशल मीडिया तालुका प्रमुख काकासाहेब पिसाळ, सुनील खंडागळे, अमोल गांगर्डे, भाऊसाहेब गांगर्डे, चंद्रकांत महारणवर, विठ्ठल ननवरे, रामा शिंदे, देविदास महारणवर, भाऊसाहेब गावडे, वैभव गांगर्डे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.