‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये नुकताच एक 14 वर्षांचा मुलगा करोडपती ठरला आहे. या शोच्या इतिहासातील हा सर्वांत कमी वयाचा स्पर्धक आहे, ज्याने एक कोटी रुपये जिंकले आहेत. या मुलाचं नाव मयांक असून तो मूळचा हरयाणाचा आहे. मयांकने केबीसीमध्ये एक कोटी रुपये जिंकले आहेत. स्पेशल केबीसी ज्युनियर वीकदरम्यान मयांकने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. आठवीत शिकणाऱ्या मयांकचं ज्ञान पाहून सर्वजण थक्क झाले .
एक कोटी रुपयांच्या मेगा प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर मयांकच्या डोळ्यात अश्रू आले. ‘नव्याने सापडलेल्या खंडाला अमेरिका हे नाव असलेला नकाशा तयार करण्याचं श्रेय कोणत्या युरोपियन कार्टोग्राफरला जातं’, असा प्रश्न त्याला एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आला होता. यासाठी त्याला चार पर्याय देण्यात आले होते. A- अब्राहम ओर्टेलियस B- गेराडस मर्केटर, C- जियोवानी बॅटिस्टा अग्निसी आणि D- मार्टिन वाल्डसिम्युलर असे हे पर्याय होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर मार्टिन वाल्डसिम्युलर असं होतं. मयांकने हे अचूक उत्तर देऊन एक कोटी रुपये आपल्या नावावर केले. त्यानंतर त्याला सात कोटी रुपयांसाठीचा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्याचं योग्य उत्तर माहीत नसल्याने त्याने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.