अहमदनगर -वेल्डिंगचे काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडके, लोखंडी रॉड व धारदार हत्याराने मारहाण केल्याची घटना केडगाव लिंक रस्त्यावर 9 सप्टेंबर रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घडली रणजीत देवराम वैरागर (वय 39 रा. लालटाकी, बारस्कर कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून गुरूवारी (26 सप्टेंबर) भाजप पदाधिकारी नीलेश सातपुते सह आठ जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलेश सातपुते, राजेंद्र सातपुते, निखील सातपुते, महादेव सातपुते, अर्चना सातपुते, सुनीता सातपुते, गणेश कोतकर व नांगरे (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. केडगाव) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वैरागर हे नगरसेवक विजू पठारे यांच्या ऑफीसवर वेल्डींगच्या कामासाठी गेले होते.
फिर्यादी वेल्डींगचे काम करत असताना संशयित आरोपी लाकडी दांडके, लोखंडी रॉड, धारदार हत्यार घेऊन आले. ‘तू इथे कोणाला विचारून काम चालू केले, तुझे नाव काय आहे, असे विचारले असता फिर्यादीने मी नगरसेवक विजू पठारे यांच्याकडे काम चालू केल्याचे सांगितले. त्यानंतर संशयित आरोपीने फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली.‘तुम्ही मला शिवीगाळ का करता, जे काही असेल ते मालक पठारे यांना सांगा’, असे फिर्यादीने सांगताच संशयित आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अमोल भारती करत आहेत. दरम्यान, या घटनेत यापूर्वी सातपुते यांच्या फिर्यादीवरून विजय पठारे व इतरांवर गुन्हा दाखल झालेला आहे. घटनेनंतर 17 दिवसांनी विरोधी गटाची फिर्याद दाखल झाली आहे.