केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात १३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली होती. या दोन्हीही मतदारसंघामधून त्यांचा विजय झाला होता. मात्र, त्यानंतर राहुल गांधी यांनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. दरम्यान, काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी याआधीच जाहीर केलं होतं की, वायनाडमधून प्रियंका गांधी या निवडणूक लढवतील. त्यामुळे आता प्रियंका गांधी या पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे वायनाडच्या या पोटनिवडणुकीकडे अनेकांचे लक्ष असणार आहे.